बुलडाणा : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच बुलडाण्यामध्ये एका हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली. खामगाव शहरात एक हॉटेलवर प्रेमी युगालांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, दोघेही हॉटेलच्या रुममध्ये होते. आधी तरुणीची हत्या करण्यात आली आणि नंतर तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या छातीमध्ये चाकूने कुणी वार केला, याबद्दल पोलीस तपास करत आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव शहरातील चिखली बायपास भागातील जुगनू हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. हॉटेलमधील एका खोलीत तरुणीचा आणि खोलीच्या बाजूला युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृत युवक बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा गावातील असून सोनू उर्फ साहिल राजपूत असं त्याचं नाव आहे. तर तरुणी साखरखेर्डा गावाला लागूनच असलेल्या शिंदी गावातील असून ऋतुजा पद्माकर खरात असं मृत तरुणीचं नाव आहे.
ऋतुजावर चाकूने केले वार
साहिल राजपूत आणि ऋतुजा खरात हे दोघेही मंगळवारी रात्री हॉटेलवर आले होते. त्यानंतर खोलीमध्ये साहिलने ऋतुजावर सोबत आणलेल्या धारदार चाकूने गळ्यावर, छातीवर आणि हातावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर साहिलच्या छातीवर 3 घाव असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडलं असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आधी साहिलने ऋतुजावर चाकू नये सपासप वार केले आणि त्यानंतर स्वतःच्या छातीत तीन वेळा चाकू भोसकून आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला जात आहे.
हॉटेलवर दिलं दुसऱ्याचं मुलीचं आधारकार्ड
जुगनू हॉटेलवर प्रवेश मिळवताना साहिलने साखरखेर्डा गावातीलच एका युवतीचे आधार कार्ड दिलं होतं. सुरुवातीला ही युवती साखरखेर्डा येथील असावी, असा समज पोलिसांसह सर्वांचा झाला होता. मात्र, आधार कार्ड मिळालेली युवती ही आपल्या घरी सुखरूप असल्याचं समोर आलं. मग मृत पावलेली युवती नेमकी कोण आहे, असा प्रश्न सर्वांना पडला होता. पोलीस तपासात मृत युवती ऋतुजा पद्माकर खरात असून ही खामगाव शहरात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे आली आहे.
तिसरा कुणी मारेकरी आहे का?
गेल्या काही दिवसांपासून तिचे साहिल सोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणाचा असा करून अंत झाल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ठाणेदार आणि पोलीस पोहोचले होते. फॉरेन्सिकच्या टीमच्या माध्यमातून संपूर्ण घटनास्थळी बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. या प्रकरणात आणखी तिसरा कुणी मारेकरी आहे का? याचा तपास पोलीस करत आहे.