कल्याण डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्ट निमित्त कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन मटण विक्रीसाठी बंदी घातली आहे. याबाबतच्या नोटीसा महापालिका क्षेत्रातील चिकन व मटन विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील कल्याण डोंबिवली महापालिकेने चिकन मटण विक्रेत्यांना दिलाय. या निर्णयाविरोधात हिंदू खाटिक समाजाने आक्रमक पवित्र घेतला असून आज सोमवारी हिंदू खाटीक समाजाच्या महाराष्ट्र राज्य मटण चिकन व्यापारी असोसिएशनचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष आनंद घोलप, पदाधिकारी शिरीष लासुरे यांच्या शिष्टमंडळाने भेट आयुक्तांची घेतली आणि महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत ही बंदी मागे घेण्याची मागणी केली.
advertisement
कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवरील खड्डे आहेत, स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आहे, पाणी समस्या आहे, अशी बरीच कामं कल्याण डोंबिवली महापालिकेला करण्यासारखं आहेत, मात्र ती केली जात नाहीत. 15 ऑगस्ट निमित्त चिकन व मटन विक्री बंद ठेवून ते आमच्या पोटावर पाय देतात. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा येत्या 15 ऑगस्टला महापालिका मुख्यालयाच्या गेटवरच मटन विक्री करण्यात येईल, असा इशारा खाटीक समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
तर केडीएमसीच्या या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने देखील या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा सचिव प्रशांत माळी यांनी सांगितलं की, "१९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. पारतंत्र्याकडून स्वातंत्र्यात आलो. या निर्णयाद्वारे नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रकार आहे. या बंदीमुळे धनगर समाज, खाटिक समाजाच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. केडीएमसीच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निषेध करण्यात येत असून हा निर्णय मागे न घेतल्यास राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड याठिकाणी येऊन मांसाहारी जेवण करतील" असा इशारा माळी यांनी दिला आहे.