उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दिवसभरापासून अनेक भागांमध्ये बत्ती गुल झाली आहे. महापारेषणची पडघा वीज वाहिनीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पडघा वीज वाहिनी ही मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या पडघा येथील उपकेंद्रातून ही वाहिनी सुरू होते. पडघा उपकेंद्र हे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. अनेकदा मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा आणि खारघर येथील वीज वाहिन्यांशी ती जोडलेली आहे.
advertisement
मागे काही दिवसांपूर्वी पडघा इथं वीज वाहिनीत बिघाड झाला होता. जेव्हा पडघा येथील वीज वाहिनी किंवा उपकेंद्रामध्ये तांत्रिक बिघाड होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) अनेक भागांवर होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या काही वर्षांत अनेकदा पडघा-कळवा किंवा पडघा-पाल (मानपाडा) या २२० केव्ही अतिउच्चदाब वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरसारख्या शहरांमध्ये मोठा वीजपुरवठा खंडित झाला होता. आता पुन्हा एकदा बिघाड झाल्यामुळे उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे.