राज ठाकरेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केलेली राज ठाकरेविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. उपाध्याय यांनी आपल्या याचिकेत, उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांमुळे सामाजिक वातावरण बिघडले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी अमान्य ठरवत त्यांना खडे बोल सुनावले.
advertisement
राज ठाकरेंविरोधातील याचिका हायकोर्टाऐवजी थेट सर्वोच्च न्यायलयात दाखल केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नापसंती व्यक्त केली. ज्यांनी याचिका दाखल केली ते याचिकाकर्ते हायकोर्टात का गेले नाहीत? उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. ही याचिका प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याची टिप्पणी केली.
काही महिन्यापूर्वी राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याची घोषणा केली होती. राज्य सरकार या निर्णयाच्या आडून हिंदी सक्ती करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मराठी प्रेमी संस्था, संघटना एकवटल्या. मनसे, शिवसेना ठाकरे गट, डाव्या पक्षांनी देखील याचा निषेध करत आंदोलनाची हाक दिली. त्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. या दरम्यान काही ठिकाणी मनसैनिकांकडून विविध ठिकाणी मराठीजनांचा, मराठी भाषेचा अपमान केल्याच्या प्रकरणावरून परप्रांतीयांना मारहाण करण्यात आली होती.