मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परत येत असताना, त्याच्या घराच्या खाली असलेल्या बेसमेंटमध्ये दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी अकरा गोळ्या झाडल्या, ज्यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या. गंभीर जखमी झालेल्या आयुषला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आता या हत्याकांडाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयुष कोमकरची हत्या करण्यापूर्वी हल्लेखोरांनी डीजेवर गाणं लावून संकेत दिले. त्यानंतर ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. ज्यावेळी हत्या करण्यात आली, तेव्हा बाजुच्या एका गणेश मंडळाच्या डीजेवर 'टपका रे टपका, एक ओर टपका' हे गाणं लावण्यात आलं होतं. हे गाणं सुरू असतानाच हा खून झाल्याने या दोन्ही घटनांना एकमेकांशी जोडलं जात आहे. डीजेवर गाणं लावून आधी संकेत दिले, त्यानंतर ही हत्या केल्याची परिसरात चर्चा आहे.
advertisement
'टपका रे टपका, एक पहिला टपका, चार में से एक गया, तीन का ये मटका', असं या गाण्याचे बोल असल्याने पुण्यात आणखी तीन खून होऊ शकतात, असाही एक अंदाज लावण्यात येत आहे. याबाबतची कसलीही पुष्टी पोलिसांनी केली नाही. मात्र स्थानिक लोकांमध्ये याबाबत चर्चा असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे येत्या काळात पुण्यात आंदेकर विरुद्ध कोमकर असं टोळीयुद्ध पुन्हा भडकू शकतं.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुषचे वडील गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. सध्या तो तुरुंगात आहेत. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर यांचा भाचा देखील होता. त्यामुळे, ही हत्या जुन्या वैमनस्यातून आणि 'खून का बदला खून' या सूड भावनेतून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
पुणे गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, गुन्हेगारांना इशारा देताना, "चुकीला माफी नाही" असे म्हणत, कोणताही गुन्हा करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा, असा संदेश दिला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.