रत्नागिरी : मंडणगड न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार सुनील तटकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रविवार, दिनांक 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार असून, या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही उपस्थित राहणार आहेत.
advertisement
मात्र या कार्यक्रमाच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेतून स्थानिक खासदार सुनील तटकरे यांचे नाव वगळण्यात आले असल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या पत्रिकेत स्थानिक आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे नाव सन्माननीय अतिथी म्हणून छापण्यात आले आहे. परंतु, हा कार्यक्रम ज्या मतदारसंघात होत आहे, त्या मतदारसंघाचे खासदार असलेल्या सुनील तटकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे.
उद्घाट्नापूर्वीच रंगले राजकीय नाट्य
विशेष म्हणजे, मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील त्यात उल्लेख नाही.या निमंत्रण पत्रिकेतून खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वगळण्यात आले असल्याने या निर्णयामागील राजकीय पार्श्वभूमीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. स्थानिक पातळीवर हा मुद्दा राजकीय दुर्लक्षाचा की जाणूनबुजून घेतलेला निर्णय यावर चर्चा सुरू झाली आहे.
उद्घाटन कार्यक्रमाआधीच वातावरण तापलं
दरम्यान, या कार्यक्रमाला उच्च न्यायालयीन अधिकारी, जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश, वकील, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मात्र, निमंत्रण पत्रिकेतील नावांच्या राजकारणाने उद्घाटन कार्यक्रमाआधीच वातावरण तापलं आहे.