नेमकं काय घडलं?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम द्रुतगती मार्गावर झालेल्या या अपघाताबाबत एका प्रत्यक्षदर्शीने माहिती देताना सांगितले की, रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. दादरा नगर हवेलीची पासिंग असलेल्या या पोर्शे कारची बीएमडब्ल्यू कारसोबत शर्यत सुरु होती. त्यावेळी या गाडीचा वेग तब्बल 150 किलोमीटर इतका होता जोगेश्वरी मेट्रो स्थानकाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुभाजकावर जाऊन आदळली.
advertisement
पोर्शेची भीषण अवस्था, पाहा VIDEO
ही टक्कर इतकी भीषण होती की, पोर्शे कारचे बोनेटे, दरवाजा या भागांचे तुकडे झाले आहेत सुदैवाने टक्कर झाल्यानंतर पोर्शे कारमधील एअरबॅग्ज उघडल्या त्यामुळे कार चालवणाऱ्या तरुणाचा जीव वाचला.
चालक गंभीर जखमी, उपचार सुरू
मात्र, त्याला गंभीर दुखापत झाली आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचानामा केला आता हा अपघात नक्की पोर्शे आणि बीएमडब्ल्यू कारच्या शर्यतीमुळे घडला आहे की, यामागे आणखी कोणते कारण आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. शहर सध्या बेदरकार वाहन चालवण्यामुळे होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी हादरले आहे. अवघ्या दोन दिवसांत दोन मोठे अपघात झाले असून, त्यातील एका घटनेत १५० किमी वेगाने धावणारी पोर्शे गाडी दुभाजकावर आदळली, तर दुसऱ्या घटनेत एक भरधाव कार थेट अरबी समुद्रात कोसळली. या दोन्ही घटनांमुळे मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कोस्टल रोडवरुन कार गेली खाली
या अपघाताच्या दोन दिवस आधीच शहरात एक गंभीर दुर्घटना घडली होती. सोमवारी रात्री कोस्टल रोडवर भरधाव वेगातील एका कारने रेलिंग तोडून थेट अरबी समुद्रात उडी घेतली होती. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फ्रशोगर दारयुश भट्टीवाला (२९) नावाचा चालक अर्टिगा कार चालवत होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भट्टीवाला हा मद्यधुंद अवस्थेत होता आणि महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना कार रेलिंग तोडून सुमारे ३० फूट खाली समुद्राच्या पाण्यात कोसळली.
या भीषण घटनेवेळी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान पांडुरंग काळे आणि विकास राठोड तसेच एका बायकुला पोलीस कॉन्स्टेबलने दाखवलेल्या धैर्यामुळे चालकाचा जीव वाचला. या तिघांनी तात्काळ समुद्रात उडी घेतली आणि दोरीच्या मदतीने चालकाला बाहेर काढले. कारमध्ये भट्टीवाला हा एकटाच होता आणि त्याला किरकोळ दुखापती झाल्यामुळे उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.