गेल्या अनेक वर्षापासून बहुजन समाजातील तरुणांना अहद कॅनडा ते तहद ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून उद्योगाची वाट दाखविणारे, पुरोगामी विचारांचे खंदे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करून हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या हल्ल्याचा म्होरक्या दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली.
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना प्रवीण गायकवाड यांनी म्हटले की, अक्कलकोटमध्ये झालेला माझ्यावरील हल्ला व्यक्तीगत नसून हा विचारांवर होता. ही विचारांची नाही, विकृतीची लढाई आहे. संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. सुरुवातीला मला देखील वैयक्तिक हल्ला असल्याचे वाटत होते. मात्र, जसजशी माहिती समोर येऊ लागलीय, तसतसा हा हल्ला संभाजी ब्रिगेडवर झाला असल्याचा दावा गायकवाड यांनी केला.
advertisement
पुरोगामी संघटनांना संपवण्याचा प्रयत्न...
2014 नंतर देशात आणि राज्यात प्रतिगामी आणि पुरोगामी विचारांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्या संघटनांना संपवण्याबाबतची चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. कालचा हल्ला हा मला संपवण्यासाठी होता, हे कालच्या घटनाक्रमातून लक्षात आले. डॉ. दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी यांना संपवण्यात आले पण त्यांचे विचार मारू शकले नाहीत. हीच बाब या हल्लेखोरांना कळत नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी यांच्यावरही हल्ले झाले. पण, त्यांच्या विचारांना कोणी संपवू शकले नाहीत.
शिवसेना, राष्ट्रवादी फोडली. पण, संभाजी ब्रिगेडसारख्या सामाजिक संघटनांना संपवता येत नाही. ईडी वगैरेचा परिणाम आमच्यावर होत नाही. त्यामुळेच हे असल्या काही लोकांकडून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात विकृतीची लढाई सुरू झाली आहे. अनेक नेते भाजपला शरण जात आहेत. जनता हे सगळं पाहत आहे. पण, इतर देशांमधील जनतेप्रमाणे राज्यातही महायुतीविरोधात जनता पेटून उठेल, असे गायकवाड यांनी म्हटले.
दीपक काटेसाठी भाजपच्या बड्या नेत्याचा पोलिसांना फोन...
दीपक काटेविरोधात जे आणखी कलमे लावायला हवी होती. पण, ती लावण्यात आली नाहीत. पोलीस यंत्रणेवर आमचा आता विश्वास नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अक्कलकोट पोलिसांना फोन करून काळजी घेण्याची सूचना केली असल्याची माहिती मला काहींनी दिली. हल्लेखोर दीपक काटेला येत्या एक-दिवसात तुरुंगातून बाहेर काढले जाण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडून सुरू असून त्याचा सत्कार काही हिंदुत्ववादी संघटनाच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला.