पुण्यातील आंदेकर-कोमकर यांच्यात भडकलेले टोळीयुद्ध, नामचिन गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कारवाया, शहरात कोयता गँगचा झालेला उदय आणि मागील काही महिन्यांत त्यांनी घातलेला धुडगूस, त्यातून सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात बसलेली भीती, महिला असुरक्षिततेचा मुद्दा, शहरात उद्भवलेली वाहतूक कोंडीची जटील समस्या अशा अनेक प्रश्नांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'बोल भिडू'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विशेष करून पुण्यातील टोळीयुद्ध मोडून काढण्यासाठी पोलिसांचे कसे प्रयत्न सुरू आहेत, हे सांगितले.
advertisement
मारणे-मोहोळ टोळीचे रिल्स अचानक बंद कसे झाले? नांग्या कशा ठेचल्या?
नव तरुणांना गुन्हेगारीबद्दल वाटणारे आकर्षण आणि समाज माध्यमांवर त्यांचे होणारे उदात्तीकरण यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारले असता, नवोदित मुलांना टोळ्यांचे आकर्षण होते आहे हे खरे आहे. समाज माध्यमातून त्यांचे उदात्तीकरणही होते. परंतु आपण बारकाईने पाहिले तर हे प्रमाण आता आपल्याला कमी झालेले दिसेल. आम्ही जबाबदारीने सांगतो की मागच्या एक वर्षापूर्वी जी स्थिती होती ती आता नक्कीच नाहीये. कोथरूडमध्ये सक्रीयपणे काम करणाऱ्या ज्या काही गँग्स असतील, त्यांच्या सोशल मीडियाचे पेट्रोलिंग करून उदात्तीकरण करणारे रिल्स आम्हाला दिसले, त्यावर आम्ही अत्यंत आक्रमक पद्धतीने कारवाई केली आहे. सध्याच्या काळात आम्ही लक्ष ठेवून आहोत की, ज्या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे उदा- आंदेकर मारणे घायवळ टोळी... अशा टोळीसंबंधी कुणी स्टेटस ठेवले तर आम्ही त्यांना थेट उचलतो आणि ते टोळीचे सदस्य नाहीत हे सिद्ध करून दाखवा, असे आव्हान आम्ही त्यांना देतो. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुलेही भेदरली आहेत, असे विशेष करून पुणे पोलीस आयुक्तांनी अधोरेखित केले. जर आपण असे स्टेटस ठेवले, रील्स सोशल मीडियावर शेअर केल्या तर आपले काही खरे नाही, हे त्यांना कळून चुकले असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्या मनात भीती बसलीये...!
पुण्यात सध्या तरी असे कोणतेच गुंड नाहीत ज्यांना लोक घाबरू शकतील, कारण त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत आक्रमकपणे कारवाई केली आहे. गुन्हा केला की आपण जेलमध्ये जाऊ, तिथले फुकट जेवण करू, पाहुणचार घेऊ आणि जामीन घेऊन तुरुंगातून बाहेर पडू, असे प्रत्येक नामचिन गुन्हेगाराला वाटत असते. गुन्हेगाराचा पोलीस आणि तुरुंगासोबतचा सहयोगीपणाची भावना असते ते तोडण्याचे काम मी आल्यानंतर केले. एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला की त्याचे कुटुंब, त्याला आधार देणारे लोक आणि त्याच्या आर्थिक स्त्रोतांवर घाव घालण्याचे काम पोलीस करतात, ही भीती त्याच्या मनात बसायला पाहिजे आणि ती बसलीये, हे सांगताना आम्हाला बरे वाटते.