ऐन गणेशोत्सव काळात पुणे शहरात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. आंदेकर-कोमकर टोळी युद्धातून गुन्हेगारी जगताशी कसलाही संबंध नसणाऱ्या महाविद्यालयीन तरुण आयुषची हत्या करण्यात आली. आयुषची आई कल्याणी कोमकरने पोलीस तक्रारीत बंडू आंदेकर आणि त्यांच्या टोळीविरोधात तक्रार दिली आहे. बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या ६ आरोपींची नावे आयुषच्या हत्या प्रकरणात आहेत. 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत आंदेकर कुटुंबाशी संपत्तीवरून असलेला वाद, आंदेकर आणि कोमकर यांचे बिघडलेले कौटुंबिक संबंध, वनराज आंदेकरची हत्या, दोन टोळ्यांमधला संघर्ष यावर भाष्य करतानाच मुलगा गेल्याची वेदना आयुषच्या आईने व्यक्त केली.
advertisement
ज्यांनी आयुषचं नाव ठेवलं, त्याचंच नाव अण्णांनी मिटवलं, नातवाची हत्या केली, त्यांना काळीज नाही का?
कल्याणी कोमकर म्हणाल्या, जे घडले ते आम्हाला सगळ्यांनाच अनपेक्षित होते. माझ्या मुलावर गोळीबार झाला हे ऐकल्यावर मला शॉक बसला. माझ्याच घरच्यांनी असे कसे केले, या प्रश्नाने मी व्याकूळ झाले. आयुषचे नामकरण माझ्या वडिलांनी म्हणजेच बंडू आंदेकर (अण्णा) यांनीच केले होते. लहान असताना त्यांनी आयुषचे खूप लाड केले, पण त्यालाच मारताना त्यांनी काहीच विचार का केला नसेल? त्यांना काळीज नाहीये का? जर घरच्यांसोबत ते असे वागत असतील तर बाहेरच्यांशी कसे वागत असतील? याचा पोलिसांनी जरूर विचार करावा. त्यांनी घरातल्यांना सोडले नाही, ते बाहेरच्यांना कसे सोडतील? आंदेकरांचा माज कुणालाच दिसत नाही का...? पैशापुढे जग सारं झुकतंय.. असे सांगत असताना कल्याणी हुंदक्यांनी दाटल्या होत्या.
माझ्या मोठ्या बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला, माझा विषयच नव्हता
आंदेकर कुटुंबाशी संपत्तीवरून असलेल्या वादाबद्दल बोलताना कल्याणी कोमकर म्हणाल्या, माझी मोठी बहिणी म्हणजे संजीवनी कोमकर तिने संपत्तीत हिस्सा मागितला होता. ती देखील अण्णांसारखीच रागीट आणि तापट स्वभावाची आहे. तिने संपत्तीत हिस्सा मागितल्यावर कृष्णाला मोक्कातून सुटून तुरुंगाबाहेर येऊ देत, मग आपण बोलू, असे तेव्हा अण्णांनी तिला सांगितले. परंतु कृष्णा बाहेर आल्यावर अण्णांनीही तिला बोलावले नाही, माझी बहीणही त्यांच्याकडे गेली नाही. या सगळ्यात माझा अजिबात कुठेही विषय नव्हता. मी त्यांना अजिबात हिस्सा मागितला नाही. मी आणि माझ्या मुलाबाळांचं चांगले चाललेले होते. पण हे सगळं आता माझ्या पोराच्या जीवावर बेतलं. आता माझ्या बापाला तुरुंगातून सोडू नये. माझ्या वडिलांना शिक्षा देण्याचे मला चांगले वाटत नाही. पण माझ्या पोराने काय केले होते? असा आर्त सवाल कल्याणीच्या आईने वारंवार विचारला.
सख्ख्या नातवाच्या हत्येचा प्लॅन तरी आजीला माया आली नाही? मामीही शांत बसली
मी पोलीस तक्रार करताना आंदेकर घरातील सगळ्यांचीच नावे का दिली? तर त्यांच्या घरातील सगळ्यांनाच या घटनेची माहिती होती. या गोष्टीचे प्लॅनिंग करताना घरातील सगळ्या सदस्यांना याची कल्पना होती. माझ्या काळजाच्या तुकड्याला मारून टाकण्याचा प्लॅन होत असताना कुणालाच कशी कळकळ आली नाही. त्यातील कुणीही मला सांगितले असते तर माझ्या मुलाला मी घराबाहेर सोडले नसते. लक्ष्मी आंदेकर ही आजी असूनही तिला काहीच वाटले नाही का? सोनाली आंदेकर ही देखील आयुषची मामी आहे, तिलाही भाच्याबद्दल असे प्लॅनिंग सुरू असताना सांगावेसे वाटले नाही का? सगळ्यांना याबद्दल कल्पना असतानाही कुणीच मला याबद्दल सांगितले नाही, त्यामुळे मी सगळ्यांची नावे पोलीस तक्रारीत नोंदवली. कृष्णा आंदेकर, शिवम, अभिषेक, सोनाली आंदेकर या सगळ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. एवढी माणसं कठोर कशी असू शकतात? असे रडत रडत कल्याणीने विचारले.