उत्तर प्रदेश सरकारचा 'बुलडोझर पॅटर्न' देशभरात गाजत असताना पुणे पोलिसांनीही शहरातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी आर्थिक स्त्रोतांवर घाव घालण्याचे ठरवले आहे. मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यात किंवा तत्सम मोठ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याचे कुटुंब, त्याला आधार देणारे लोक आदींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे पोलिसांचा 'बुलडोझर पॅटर्न'
advertisement
त्यानुसार पुण्यातील रेकॉर्डवरील आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर पुणे पोलिसांनी बुलडोझर चालवला. काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांकडून आरोपींच्या बांधकामावर बुलडोझर पॅटर्नचा अवलंब केला गेला. आरोपी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत पोलिसांनी बांधकाम पाडले. सदर आरोपी काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गुन्ह्यांमध्ये अटक असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. आता या परिसरात असणाऱ्या त्याच्या सगळ्या बांधकामावर कारवाई करत पोलिसांनी तिथे असलेले बांधकाम जमीनदोस्त केले आहे.
आरोपी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण कोण आहे?
आरोपी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण हा शहरातील मोठा गुंड आहे. त्याच्या नावावर अनेक मोठे आणि गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. खंडणी, मारहाण, दहशत पसरवणे आदी गुन्ह्यांत त्याचा समावेश आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पुणे पोलिसांनी बुलडोझर पॅटर्न का अवलंबला?
एखाद्या आरोपी गुन्हेगारावर कारवाई होते, काही महिने तो तुरुंगात राहतो आणि नंतर जामिनावर सुटतो, असे बऱ्याच प्रकरणांत घडते. मात्र गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी तसेच गुन्हा करण्याचे धाडसच होऊ यासाठी पोलिसांनी आरोपीला आधार देणारे लोक, त्याची टोळी, अवैध मार्गाने जमा केलेली संपत्ती आदींवर बुलडोझर चालवण्याचे पुणे पोलिसांनी ठरवले आहे. जेणेकरून गुन्हा केला तर पुन्हा उभा राहणे कठीण आहे ही भीती संबंधितांच्या मनात बसायला पाहिजे, असा होरा पुणे पोलिसांचा आहे.