पुण्यातील भडकलेल्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'बोल भिडू'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राज्यात चर्चेत असलेले आंदेकर कोमकर यांच्यातील टोळीयुद्ध, आंदेकर टोळीची मोडस ऑपरेंडी, गेल्या वर्षी पुण्यात घडलेले पोर्शे प्रकरण, पुण्यातील नाईट लाईफ, नव तरुणांना गुन्हेगारी वर्तुळाबद्दल वाढलेले आकर्षण अशा विविध मुद्द्यांवर अमितेश कुमार यांनी उत्तरे दिली.
advertisement
आमच्या गुप्तचर यंत्रणेकडे खरंच तशी माहितीच नव्हती...
अमितेश कुमार म्हणाले, मागच्या दीड वर्षांत पोलिसांनी खरंच टोळ्यांवर जबरदस्त पद्धतीने कारवाई केली आहे. कधी कधी पोलिसांच्या कारवायांना माध्यमे फार प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे सामान्य पुणेकरांपर्यंत त्याबद्दलची माहिती पोहोचत नाही. मागच्या एक वर्षापासून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न आंदेकर टोळीकडून केला जात होता. आमच्या व्यक्तीवर हल्ला झाला, वनराजची काहीही चूक नसताना त्याला मारले, असे आंदेकर टोळी सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे कारवाई करताना पोलिसांना सावध राहणे गरजेचे होते. शेवटी पीडित आणि साक्षीदारांची बाजू ऐकून घेणे ही देखील पोलिसांची जबाबदारी असते. या टोळीतील व्यक्तींचा गेल्या एक वर्षापासून वनराजच्या हत्येचा केसमुळे जास्त संबंध आल्याने आमची त्यांच्यावर अत्यंत बारकाईने नजर होती.
परंतु आंदेकर टोळीकडून सातत्याने व्हिक्टिम कार्ड खेळण्यात येत असल्याने आम्ही सावध होतो. आंदेकर टोळी प्रत्युत्तरादाखल काहीतरी करू शकते, याची माहिती आम्हाला मिळालेली होती. किंबहुना आम्हाला त्याची कल्पना देखील होती. त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय देखील आमच्याकडून केले गेले होते. परंतु टोळीयुद्धाच्या वादात सख्ख्या नातवालाच मारतील, हे आम्हाला अजिबातच अपेक्षित नव्हते, आमच्या गुप्तचर यंत्रणेकडे खरंच तशी माहितीच नव्हती, अशी कबुली देऊन बंडू आंदेकर टोळीचे क्रौर्याची परिसीमा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधोरेखित केले.