पुण्यातील भडकलेल्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'बोल भिडू'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राज्यात चर्चेत असलेले आंदेकर कोमकर यांच्यातील टोळीयुद्ध, आंदेकर टोळीची मोडस ऑपरेंडी, गेल्या वर्षी पुण्यात घडलेले पोर्शे प्रकरण, पुण्यातील नाईट लाईफ, नव तरुणांना गुन्हेगारी वर्तुळाबद्दल वाढलेले आकर्षण अशा विविध मुद्द्यांवर अमितेश कुमार यांनी उत्तरे दिली.
advertisement
आर्थिक स्त्रोत बंद करून टाकणार, त्याची काल रात्रीपासून सुरुवात
अमितेश कुमार म्हणाले, आंदेकर टोळीचे सगळे आर्थिक स्त्रोत बंद करून टाकण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यादृष्टीने आम्ही कारवाया देखील सुरू केल्या आहेत. त्यांच्या घरासमोर अवैध पद्धतीने मच्छी मार्केट लावून पैसे उकळण्याचे काम सुरू होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर आम्ही अत्यंत आक्रमक पद्धतीने कारवाई करून त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे काम केले. आंदेकर टोळीतल्या सगळ्या सदस्यांचे बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यांचे बँकेतील लॉकर्स सील करण्यात आलेली आहेत.
महिला असो की पुरूष, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही
टोळीतील सदस्यांच्या अनधिकृत संपत्तीवर हातोडा घालण्यासाठी आम्ही फॉरेन्सिक ऑडिट करणार आहोत. टोळीच्या पाठीचा कणा मोडण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. आंदेकर टोळीतील सदस्यांनी गेल्या काही वर्षात अनधिकृत पद्धतीने जेवढी जेवढी संपत्ती जमा केली, त्या संपत्तीची माहिती घेऊन त्याविरोधात आम्ही कारवाया करू. टोळीची आर्थिक नाकेबंदी करून त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनाही शोधून काढू. ही कारवाई करताना महिला पुरुष असा भेदभाव न करता कुणाचाही मुलाहिजा आम्ही बाळगणार नाही. महिला असो की पुरूष सगळ्यांना आम्ही आरोपी करू, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
...पुन्हा टोळी उभारी घेऊ शकणार नाही
गुन्हेगारांना केलेल्या गुन्ह्याबद्दल न्यायालयातून शिक्षा होईलच पण टोळ्यांची आर्थिक गणिते लक्षात घेऊन त्यांच्यावरच घाव घालण्यावर पोलिसांची नजर आहे. जेणेकरून गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी पुन्हा टोळी उभारी घेऊ शकणार नाही, असा विशेष प्लॅन अमितेश कुमार यांनी सांगितला.