पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ पासून आंदेकर टोळीने एका व्यावसायिकाला सतत त्रास देत त्याच्याकडून तब्बल दीड कोटी रुपयांची खंडणी उकळली. व्यवसायात अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच टोळी कडून ‘प्रोटेक्शन’ मिळावे, या कारणावरून ही रक्कम मागण्यात आली होती. मुंबईत ऐंशी नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्ड टोळ्यांनी अनेक व्यावसायिकांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली करोडो रुपये खंडणीच्या स्वरुपात घेतले, तसाच प्रकार २०१७ ते २०२५ पर्यंत आंदेकर टोळीकडून सुरू होता.
advertisement
यापूर्वीच बंडू आंदेकरसह २० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. तरीही नव्या तक्रारी आणि पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील बांधकाम व्यवसाय, स्थानिक व्यावसायिक आणि नागरी भागांमध्ये या टोळीने बेकायदेशीर दबदबा निर्माण केला होता. खंडणीसाठी दडपशाही, धमक्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या नव्या कारवाईनंतर आंदेकर टोळीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली असून पुढील तपासातून अजून काही गंभीर गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गणेश पेठेतल्या आंदेकरच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर
पुण्यातील गणेश पेठेत बंडू आंदेकर याने अवैध मार्गाने पैसे जमवून अनधिकृत बांधकाम केले आहे. हेच बांधकाम पुणे पोलिसांनी आज जमीनदोस्त केले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ही कारवाई करून गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे इरादे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी काय काय उद्ध्वस्त केले?
आयुष गणेश कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्या घराचे समोरील आणि आसपास त्याने व त्याच्या कुटुंबियांनी उभारलेले अनधिकृत घर, पत्रा शेड, शौचालय हे पुणे महानगरपालिका तसेच पोलिसांनी बंदोबस्तात पाडून टाकले.