राज्यात अवैध दारू तस्करीचा 'पुष्पा' स्टाईल कारभार सुरू असतानाच, उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. कोकण विभागीय भरारी पथकाने मुंब्रा परिसरात छापा टाकून तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे ब्रँडेड विदेशी बनावट मद्य जप्त केलं. उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंब्रा येथे एका ट्रकमध्ये लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा लपवून ठेवण्यात आला होता. या माहितीच्या आधारावर पथकाने धाड टाकली. या कारवाईत अधिकाऱ्यांनी ट्रकमधून गोवा बनावटीचे ब्रँडेड विदेशी मद्य जप्त केले. ट्रकमध्ये तब्बल 1 हजार 560 बॉक्स होते, ज्यात 13 हजार 752 लिटर अवैध मद्य होते. या साठ्याची किंमत सव्वा दोन कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं.
advertisement
या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने दोन आरोपींना त्वरित अटक केली आहे. हे आरोपी इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट मद्याची तस्करी कोठून करत होते आणि हा साठा नेमका कुठे पोहोचवला जाणार होता, याचा अधिक तपास सध्या शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिरूर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अवैध मद्यविक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.
