मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याची दाट शक्यता आहे. अशातच राज ठाकरे हे महाविकास आघाडीत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळ या मुद्यावर दोन दिवस मविआ नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. या दोन्ही वेळेस राज ठाकरे हे मविआ नेत्यांसोबत दिसून आले. राज ठाकरे यांनी शिष्टमंडळात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांना थेट मविआसोबतच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज यांनी थेटच भाष्य केले.
advertisement
पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय म्हणाले?
या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे यांनी म्हटले की, निवडणुक आली की निवडणूक आयोग आला. आणि मतदार आले. राजकिय पक्ष निवडणूक लढवतो. तुम्ही तर राजकिय पक्षांना याद्याच दाखवणार नसाल तर घोळ इथेच असल्याचे राज यांनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, 2022च्या निवडणूक यादीत मतदारांचे फोटो होते. आता, 2024च्या यादीत फक्त नावे असून फोटो नाहीत. निवडणूक आयोग सांगते की मतदारांची माहिती गुप्त आहे. मात्र, मतदान गुप्त असते. मतदाराचे नाव कसे गुप्त असेल असा सवाल त्यांनी केला.
मतदार यादीचे घोळ थांबविले नाही तर तुम्ही निवडणूक थांबवा. जर पाच वर्ष गेलीत आणखी एक सहा महिने गेले तरी चालेल, तोवर निवडणूक घेऊ नका अशी मागणी त्यांनी केली. या देशातल्या या काही पहिल्या निवडणुका नाही. पण, मागील काही निवडणुकीत असे घोळ कसे समोर आले, असा सवाल त्यांनी केला. मतदार यादीच्या प्रत्येक पानाचे 2 रुपये राजकीय पक्षांकडे मागतात, आताचे त्यातही पैसे कमविणार? असा टोलाही त्यांनी लगावला.
मविआसोबत युती करणार? राज यांनी थेट सांगितले...
राज ठाकरे यांना महाविकास आघाडीसोबत व्यासपीठावरील उपस्थितीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपण 2017 मध्येही आपण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत या मुद्यावर एकत्र आलो होतो, असे सांगितले. अजित पवार पण होते ते तावातावाने बोलत पण होते. त्यांनी यायला पाहिजे होते, असे म्हणत त्यांनी मिमिक्री केली. मविआसोबतच्या आघाडीवर भाष्य करताना म्हटले की, आता निवडणूक कशी होणार हे महत्वाचे आहे. कोणासोबत जाणार, कोणासोबत निवडणूक होणार हे महत्वाचे नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.