त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र आले आहेत. सरकारने त्रिभाषेचा जीआर रद्द केल्यानंतर आज मराठी विजय मेळावा साजरा केला जात आहे. आजच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनंच माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा शिवतीर्थ मैदानात व्हायला हवा होता, मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना इथे यायला मिळालं नाही म्हणून. मी माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्वव एकाच व्यासपिठावर येत आहोत. ज्या माननीय बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. राज ठाकरेंच्या या शब्दाने उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.
advertisement
बाळासाहेबावर शंका घेणार का?
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, हिंदी सक्तीचा मुद्दा हा खडा टाकून पाहिला आहे. मुंबई वेगळी करता येईल का, याची चाचपणी केलीय. पण, आम्ही शांत आहोत म्हणजे गांडू नाही असा इशारा त्यांनी दिला. आमच्या मुद्यावर आमची मुलं कोणत्या शाळेत शिकली हा मुद्दा काढला. उद्धव आणि मी आम्ही दोघं मराठी शाळेत शिकलो. पण, एक सांगतो की, बाळासाहेब, श्रीकांत ठाकरे यांनी इंग्रजी माध्यमातून शिकले, त्यांच्या मराठीवर शंका घेणार का, असा सवाल राज यांनी केला. आडवाणी हे मिशनरी स्कूलमधून शिकले, त्यांच्या हिंदुत्वाबाबत शंका घेऊ का असा रोखठोक सवाल राज यांनी केला.