मनसेचा संताप...
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला आपलं खातं उघडता आले नाही. मनसेचे एकमेव आमदारही पडले. महायुतीने एकाच ठिकाणी पाठिंबा दिला. तर, उर्वरित ठिकाणी कोणतेही सहकार्य केले नाही. या उलट मनसेने महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची टक्केवारी कमी झाली. त्यामुळे मनसेला आता प्रादेशिक पक्षाचा दर्जाही गमवावा लागण्याची भीती आहे. तर, दुसरीकडे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आपला संताप व्यक्त करत महायुतीवर निशाणा साधला आहे.
advertisement
महायुतीने फसवणूक केलीय...
अविनाश जाधव यांनी म्हटले की, महायुतीने जेवढी आमची फसवणूक केलीय तेवढी फसवणूक कोणीच केली नाही. आम्ही यांना लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला. त्याचा फायदा त्यांना कुठे कुठे झाला हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. रत्नागिरी असेल किंवा इतर जागा असतील, त्यात मनसेची कळीची भूमिका राहिली आहे. ज्या व्यक्तीने मैत्रीमध्ये सगळ्या गोष्टी सोडल्या, त्याच्या पक्षाला तुम्ही पाण्यात पाहता, हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे सांगत जाधव यांनी महायुतीवर संताप व्यक्त केला.
त्यांनी पुढे म्हटले की, महायुतीकडून आमच्याबाबतीत चांगला निर्णय घेतील याची फारशी अपेक्षा नाही. त्यांचा पूर्वइतिहास पाहता मनसेच्याबाबत योग्य निर्णय घेतील याची अपेक्षा नाही अविनाश जाधव यांनी सांगितले.
