शिवसेनेतल्या फुटीनंतर होणारा हा तिसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याचीही तिसरी वेळ आहे. शिवसेना ठाकरे गटाचा 59 वा वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारी आहेत. शिवाय ते पालिका निवडणुकांचं रणशिंगही वर्धापन दिनी फुंकणार आहेत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदेही शक्तीप्रदर्शन करणार आहेत. एकनाथ शिंदे ही वर्धापन दिनाच्या निमित्ताने पालिका निवडणुकीचं रणशिंग फुकतील.
advertisement
या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मराठीचा मुद्दा, पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती आदी मुद्यांवरही भाष्य होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने नव्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी भाषा म्हणून मागील दाराने हिंदी सक्ती केल्याचा आरोप होत आहे. सरकारच्या या निर्णयावर मराठी प्रेमी संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.
मनसेचे शिवसेना शिंदे गटाला चॅलेंज....
मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना शिंदेला गटाला चॅलेंज केले आहे. आज शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून तेच खरी शिवसेना आहे, असा दावा करत आहेत. एक शिवसेना सत्तेत आहे आणि त्याच शिवसेनेचे मंत्री दादा भुसे हे हिंदी सक्तीचा जीआर काढतात. खरोखर तुम्ही बाळासाहेबांचा विचार मानत असाल तर तत्काळ त्यात बदल करा अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने भाजपच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता दोन भाषा सूत्र पहिली ते पाचवी राबवला गेला पाहिजे, असेही देशपांडे यांनी म्हटले.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानत असाल तर तुम्ही हिंदी सक्तीला त्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे, असे थेट आव्हानच देशपांडे यांनी दिले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या देशमुख यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. मराठी द्वेष दिसत असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. चिंतामणराव देशमुख यांचा आदर्श दादा भुसे यांनी घेतला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.