Uddhav Thackeray Ekanth Shinde: शिंदे-ठाकरे गटाचे रात्रीस खेळ चाले! फोनाफोनी अन् मनधरणी, नेमकं घडतंय काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray Eknath Shinde : शिवसेना वर्धापन दिनाच्या आधीच शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या रात्रीच्या वेळी हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई : आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात असताना दुसरीकडे डॅमेज कंट्रोलचाही प्रयत्न होत आहे. शिवसेना वर्धापन दिनाच्या आधीच शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या रात्रीच्या वेळी हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेतल्या फुटीनंतर होणारा हा तिसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याचीही तिसरी वेळ आहे. शिवसेना ठाकरे गटाचा 59 वा वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारी आहेत. शिवाय ते पालिका निवडणुकांचं रणशिंगही वर्धापन दिनी फुंकणार आहेत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदेही शक्तीप्रदर्शन करणार आहेत. एकनाथ शिंदे ही वर्धापन दिनाच्या निमित्ताने पालिका निवडणुकीचं रणशिंग फुकतील.
advertisement
शिंदे-ठाकरे गटाचा रात्रीस खेळ चाले...
वर्धापन दिनाच्या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज होणाऱ्या वर्धापन दिनाच्या आधी शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे मोहरे आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यानिमित्ताने रात्रीच्या वेळी माजी नगरसेवक, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून फोन केले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
तर, दुसरीकडे ठाकरे गटाला याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनीदेखील ज्यांना फोन गेलेत, अशांना संपर्क सुरू केले आहेत. पक्षात थांबण्याची गळ त्यांना घातली जात असल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न केले जात आहेत.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 55 माजी नगरसेवक सहभागी झाले होते. मागील सहा महिन्यात 9 माजी नगरसेवकांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 19, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Ekanth Shinde: शिंदे-ठाकरे गटाचे रात्रीस खेळ चाले! फोनाफोनी अन् मनधरणी, नेमकं घडतंय काय?