विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मतदारयादीबाबत राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बुथनिहाय मतदारयादीची पडताळणी करण्याची सूचना केली होती. त्याशिवाय, संघटनात्मक बांधणीचे आदेश दिले होते.
मागील दोन दिवस महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. या दरम्यानच्या भेटीत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मतदारयादी घोळही त्यांनी लक्षात आणून दिला. मतदारयादी सदोष असेल तर त्रुटी दूर करेपर्यंत सहा महिने निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली होती.
advertisement
रविवारी मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीचा पक्ष मेळावा बोलावला आहे. रविवारी 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला असून यात BLA, गटाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती, बूथ लेव्हल एजंट्स (BLA) ची भूमिका, मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या आणि प्रचाराचे दिशानिर्देश या विषयांवर राज ठाकरे मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
या तातडीच्या बैठकीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणत्या नव्या सूचना देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.