परमेश्वर भीमराव खवल असं मृत पावलेल्या ३८ वर्षीय भाविकाचं नाव आहे. ते संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातील रहिवासी आहेत. ते काही दिवसांपूर्वी रेल्वेनं एकटेच केदारनाथ यात्रेसाठी गेले होते. पण वाटेत अनर्थ घडून देवदर्शनाआधीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर खवल हे गौरीकुंडाहून केदारनाथकडे पायी जात होते. त्यावेळी अचानक दरड कोसळली. या दरडीखाली ते सापडले. बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
advertisement
परमेश्वर खवल यांचा अशाप्रकारे केदारनाथ यात्रेदरम्यान मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मृतदेह महाराष्ट्रात आणला जाईल आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन केला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.