संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. संजय राऊत यांनी म्हटले की, 5 जुलैला विजयी दिवस साजरा होणार आहे. या विजय मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संबोधित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही लढणारे लोक आम्ही उभे राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
राऊतांचे भाजपला आव्हान...
advertisement
हिंदी सक्तीच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनेसह इतर पक्ष संघटना आक्रमक झाले आहेत. तर, दुसरीकडे भाजपने ठाकरे गटावर जोरदार पलटवार केला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीच त्रिभाषा धोरणाला मंजुरी दिली होती. माशेलकर समितीच्या अध्यक्षतेखाली जो अहवाल तयार झाला, त्यावर उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावरून ठाकरे गटाचा यात स्पष्ट सहभाग होता, असा आरोप भाजपने केला आहे.
यावर संजय राऊत यांनी म्हटले की, आम्ही महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या आदेशाचा जीआर जाळला. उद्धव ठाकरे यांनी तसा आदेश घेतला होता, असा दावा असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील शासन आदेश आझाद मैदानात जाळावा, त्यांना आम्ही जागा देऊ, अथवा शिवसेना भवनासमोर येऊन तो आदेश जाळावा, असे आव्हान राऊत यांनी दिले.
ठाकरे बंधू एकत्र दिसणार...
पहिलीपासून त्रिभाषा सक्तीविरोधात आंदोलनाची धग पेटल्यानंतर आता राज्य सरकारने दोन्ही जीआर रद्द केले. त्यानंतर 5 जुलैचा मोर्चा रद्द करण्यात आला असून आता विजयी मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात जवळपास 20 वर्षांनी उद्धव आणि राज हे दोघेही जण एकाच राजकीय व्यासपीठावर एकत्र हजेरी लावणार आहेत. या विजयी मेळाव्याची तयारी सुरू असून वरळी येथे हा मेळावा पार पडणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.