नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना वेगवेगळ्या मुद्यावर भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवरही भाष्य केले. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर टीका केली. आपला देश हा आधी धार्मिक होता. मात्र, मोदींनी त्याला धर्मांध केला. पंतप्रधान मोदींनी दिलेला स्वदेशीचा नारा काँग्रेसचा आहे. आज त्यांच्याच नारा पुन्हा देत मोदी हे गांधीवादी-नेहरूवादी झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
advertisement
ठाकरे गट-मनसेच्या युतीवर भाष्य...
संजय राऊत यांनी म्हटले की, मुंबईसह, ठाणे, नाशिक, कल्याण, छत्रपती संभाजीनगर अशा सर्व ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र निवडणुका जिंकतील. या सर्व महानगरपालिकांवर आमची चर्चा सुरू आहे. आता कोणतीही अघोरीशक्ती आली तरी मराठी माणसाची वज्रमुठ तोडू शकत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी नाशिकमध्ये दिली. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना मनसे एकत्र निवडणुका लढणार हे आता निश्चित झाले असल्याचे म्हटले जात आहे. मनसेसोबतच्या युतीबाबत आमची अद्यापही चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठीच्या मुद्यावर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिनी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दोन्ही बंधू निवडणुकीत एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
उतावळा नवरा.... भाजपची बोचरी टीका...
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपने बोचरी टीका केली आहे. 'उतवळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग' अशी ठाकरे गटाची अवस्था झाली असल्याचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले. राज ठाकरेंसोबत युती न केल्यास आपल्या पक्षाचे अस्तित्व संपून जाईल, अशी भीती राऊत यांना वाटत आहे. त्यामुळेच राऊत यांना वाटत असल्याचे दरेकर यांनी म्हटले.
इतर संबंधित बातमी:
ठाकरे बंधूंच्या युतीला तीन दिवसात पहिला धक्का, फडणवीसांचे दोन शिलेदार सज्ज, CM ची मोठी खेळी