मुंबई : एका बाजूला ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीबाबतही चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील मनसेचा समावेश महाविकास आघाडीत करण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंबाबतचा निर्णय दिल्लीत होईल असे काँग्रेसने म्हटले. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील काँग्रेसबाबत भूमिका घेतली असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आणि महाविकास आघाडीबाबत भाष्य केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या समावेशाबाबत काँग्रेस हायकमांड निर्णय घेतील असे म्हटले.
संजय राऊत यांनी म्हटले की, काँग्रेसचे महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून होतात. राज ठाकरे यांचा आघाडीत समावेश करायचा असल्यास उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्याशी चर्चा करू शकतात. मी देखील राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा करू शकतो.
राज्यातील राजकारणात काही पक्षांचे स्थान आहे. काँग्रेसदेखील सोबत यावी अशी राज ठाकरे यांची देखील इच्छा असल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र, ही भूमिका असून कोणताही निर्णय नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राज्य मुख्य निवडणूक आयोगाची घेणार भेट..
राज्यातील विरोधी पक्षांच्यावतीने मंगळवारी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहेत. यावेळी शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, कॉम्रेड अजित नवले यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत. मतदारयादींपासून ते निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने ही भेट होणार असून सगळ्याच पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. निवडणूक आयुक्तांसोबतच्या भेटीनंतर पत्रकार परिषद होणार असल्याची माहितीदेखील संजय राऊत यांनी दिली.