सातारा : सातारा जिल्ह्यातील माणभाग हा कायमच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. दुष्काळ म्हटलं की माणचे नाव सर्वांच्या पाहिले ओठावर येते. मात्र, या दुष्काळावर मात करण्यासाठी माणदेशी दुष्काळी भागातील गोंदवले खुर्द या छोट्याशा गावातील रक्षिता बनसोडे हिने दुष्काळी परिस्थितीशी झुंज देत माण तालुक्यातील अनेक गावात 10 हजार पेक्षा जास्त वड आणि पिंपळ वृक्ष लागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. तसेच अनेक गावात डोंगर उताराला चर काढून पाणी अडवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. हे परिश्रम घेत असताना तिच्या मोठ्या भावाची म्हणजेच रोहित बनसोडे याची मोठी साथ तिला लाभली आहे. त्यांनी घेतलेल्या या परिश्रमामुळेच 7 वर्षात अनेक टेकड्यांवर पाणी साचले आणि तेथे शेकडो वृक्षचे संवर्धन करता आले.
advertisement
दुष्काळी भागात झाडांची लागवड
तसं पाहायला गेलं तर सातारा जिल्हा हा दोन भौगोलिक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो. एक म्हणजे सह्याद्रीचे अभयारण्य आणि मोठीच्या मोठी हिरवी डोंगररांग तर दुसरीकडे सातारच्या पूर्वेकडील भाग जो कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून होरफळू लागला आहे. सर्वात कमी पाऊस असणारा ओसाड, दगड -धोंड्याचा परिसर आपल्याला माण भागात पाहायला मिळतो. मात्र हीच परिस्थिती बदलण्यासाठी वनरक्षिता रक्षिता बनसोडे हिने गेले 7 वर्ष झालं अथक परिश्रम घेऊन 10 हजार पेक्षा जास्त वड आणि पिंपळ लागवड करून झाडांचे संगोपन या भागांमध्ये केले आहे. ज्या भागांमध्ये पिण्यासाठी पाणी वेळेवर मिळत नाही, रखरखत्या उन्हात कोणताही प्राणी, पक्षी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये राहू शकत नाही अशा ओसाडरानावर रक्षिता आणि तिचा भाऊ रोहित यांनी वृक्षारोपण करत अनेक प्राणी आणि पक्षांना मोठमोठ्या झाडांची सावली तयार करून दिली आहे.
वृक्षारोपण करण सोपं असतं मात्र त्यात झाडांची निगा राखणं त्याचे संगोपन करणं खूप अवघड असते. एखाद्या वेळी जिथे पाणी असते तिथे झाडे लावून त्याचे संगोपन करणे अगदी सोप्प मात्र दुष्काळी भागामध्ये पिण्यासाठी पाणी नाही, तिथे हजारो झाडांना शेकडो मीटर अंतरावरून जाऊन बादलीच्या साह्याने पाणी आणून झाडांना जगवणे हे खूपच कठीण आहे. तरीही आपल्या जिद्दीवर आणि पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहाटेपासून ही बहीण-भाऊ कामाला सुरुवात करतात.
झाडांना दुसऱ्याच्या विहिरी, तळी, झरे, ओढे जिथून मिळेल तिथून पाण्याची व्यवस्था करून हजारो झाडांना रोज पाणी घालतात. रक्षिता एखादे वृक्ष लावत असताना स्वतःच त्या वृक्षासाठी खड्डा खोदते, वृक्ष लावते त्या वृक्षाला स्वतःच पाणी घालते, त्याची निगा आपल्या घरचा कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे करते. त्यामुळेच उष्ण तापमानात देखील माणदेशी भागांमध्ये हजारो वड आणि पिंपळ झाडांचे संगोपन केले. या झाडांवर मोर, घुबड, चिमणी यांसारखे अनेक पक्षी येऊन आपले घर बसू लागले आहेत. या मुळेच मी आत्ता संकल्प केला आहे तो म्हणजे श्वासात श्वास असे तोपर्यंत 1 लाख वड आणि पिंपळाचे वृक्षारोपण करणार आहे, असं रक्षिता बनसोडे हिने सांगितले.