सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रुई हे एक छोटेसे गाव आहे. या गावचे सुपुत्र सुनिल सावंत हे सैन्यदलात कार्यरत होते. मात्र 21 वर्षांपूर्वी त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. तेव्हापासून आजतागायत नीता सावंत या वीरपत्नी म्हणून जीवन जगत आहेत. 2001 साली झालेल्या पतीच्या निधनानंतर नीता यांनी आपल्या एकुलत्या एक छोट्या मुलीला चांगल्या पद्धतीने वाढवले आहे. मात्र तेव्हापासून त्या एका विधवेचे जीवन जगत होत्या.
advertisement
गृह प्रवेशाला विधवांना मान, शाहूनगरीत प्रबोधनाचा नवा आदर्श, Video
कशी सुचली कल्पना
नीता सावंत यांची कन्या शिवानीचा विवाह नुकताच कोंडवा येथील ननावरे कुटुंबात झाला आहे. मात्र या विवाहप्रसंगी लग्नपत्रिकेवर नीता सावंत यांच्या नावापुढे श्रीमती लागलेली गोष्ट त्यांच्या कुटुंबीयांना खटकली. एकुलत्या एक मुलीचा विवाह हा एकच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस होता. याप्रसंगी त्यांना विधवा म्हणून शुभकार्यापासून दूर राहावे लागणार होते. म्हणूनच नीता यांच्या जाऊबाई सुनिता यांनी नीता सावंत यांना सुवासिनीचा मान मिळवून देण्याचा विचार केला. हा विचार त्यांनी आपल्या कुटुंबियांना, नीता यांच्या मुलीच्या सासु-सासऱ्यांना आणि जय हिंद फाउंडेशन यांना सांगितला. सर्वांनीच या विचाराला दुजोरा देत प्रोत्साहन दिल्याची माहिती सुनिता सावंत यांनी दिली.
कसा केला नीता यांचा सन्मान?
नीता सावंत यांची मुलगी शिवानीच्या लग्नाचा घाना भरणे आणि मुहुर्तमेढ कार्यक्रम 5 डिसेंबर रोजी पार पडला. लग्नाच्या पहिल्या विधी पासूनच नीता यांना सौभाग्याचा सन्मान मिळावा असा सुनिता यांचा आग्रह होता. त्यानुसारच. या घाना भरण्याच्या विधीवेळी सर्व महिलांकडून नीता सावंत यांना हळदी-कुंकू लावून त्यांना सन्मानित करन्यात आले. यावेळी त्यांना सौभाग्यवाण देण्यात आले. त्यामुळेच पुढे लग्नात आनंदाने सर्व शुभकार्य त्या करू शकल्या.
महाराष्ट्रात या गावात माकडं आहेत कोट्यधीश, तब्बल 33 एकर जमीन आहे नावावर, Video
आयुष्यातील अविस्मणीय क्षण
यावेळी 21 वर्षांनी जाऊबाई सुनिता आणि माझी मुलगी शिवानी यांच्यामुळेच हा अविस्मरणीय क्षण अनुभवता आला. त्यांनी पुढाकार घेऊनच हे सर्व घडवून आणल्यामुळे मला माझ्या मुलीच्या लग्नात सर्व कार्यात सहभागी होता आले, असे वीरपत्नी नीता सावंत यांनी सांगितले.
लग्न सोहळ्यात सौभाग्याचे लेणं
शिवानीचा विवाह सोहळा 8 डिसेंबर रोजी मोठ्या आनंदात पार पडला. याच प्रसंगी मुहुर्तमेढी वेळी आईचा सौभाग्यलेणं देऊन हळदी-कुंकू लाऊन सन्मान होणे ही एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक विधवा महिलेला असा सन्मान देऊन शुभकार्यात सहभागी करवून घेणे गरजेचे आहे, असे मत नीता यांची मुलगी शिवानी यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, अशा प्रकारे आपल्या पतीच्या निधनानंतर 21 वर्ष निराशेत जीवन व्यतीत केल्यानंतर आपल्या मुलीच्या लग्नात नीता यांना जो सन्मान मिळाला, त्याबद्दल सर्व सावंत कुटुंबीयांनी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केलेत.