गृह प्रवेशाला विधवांना मान, शाहूनगरीत प्रबोधनाचा नवा आदर्श, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हिंदू धर्मशास्त्रात बऱ्याच शुभ प्रसंगावेळी सुवासिनी महिलांना सन्मान दिला जातो. मात्र कोल्हापुरातील वावरे दाम्पत्यानं पुरोगामी पाऊल टाकलंय.
कोल्हापूर, 9 डिसेंबर : आजच्या आधुनिक जगात भारतातील कित्येक भागांत जुन्या रूढी परंपरा पाळल्या जातात. कोल्हापूर शहर हे बऱ्याचदा अशा परंपरांच्या बाबतीत अपवाद ठरलेले आहे. त्यातच आता कोल्हापूरच्या एका कुटुंबाने नव्या वास्तूच्या गृहप्रवेशावेळी चक्क विधवा महिलांना विशेष मान दिला आहे. त्यामुळे पुरोगामी कोल्हापूर ही ओळख पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.
सामान्यतः नवीन घर किंवा वास्तूमध्ये राहायला जाताना वास्तूशांती, गृहप्रवेशाच्या विधी पार पडल्या जातात. हिंदू धर्मशास्त्रात बऱ्याच शुभ प्रसंगावेळी सुवासिनी महिलांना सन्मान दिला जात असतो. अशा ठिकाणी विधवा महिलांची उपस्थिती देखील कित्येकांना पसंत नसते. पण राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या कोल्हापूरातील वावरे कुटुंबाने वेगळाच विचार केला. त्यांनी आपल्या नव्या घरात विधवा महिलांना सन्मान देऊन गृहप्रवेश केला आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील दीपक वावरे यांचे हे कुटुंब आहे. दीपक हे एक शिधापत्रिका अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
advertisement
का घेतला विधवांना सन्मान देण्याचा निर्णय..?
खरंतर दीपक यांच्या आई उमा वावरे यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. सध्याचे नवे घर हे त्यांचे स्वप्नातील घर आहे. मात्र नव्या घराच्या गृहप्रवेशावेळीच्या परंपरा दीपक यांना नातेवाईकांकडून समजल्या. तेव्हा जर आपली आई आज जिवंत असती, तर तिला देखील विधवा असल्याने या शुभ कार्यांपासून दूर राहावे लागले असते. म्हणूनच दीपक वावरे यांनी सुहासिनींऐवजी विधवा महिलांना सन्मान देण्याचे ठरवले. त्यांच्या या निर्णयाचे सर्व कुटुंबीयांनी स्वागत करत त्यांना पाठबळ दिले. त्याचबरोबर आपण शाहूंच्या नगरीत राहतो, शाहू महाराजांनी कधीच अनिष्ट रूढी परंपरांना थारा दिला नाही. त्यांच्याच विचारांचे पालन मी करत असल्याचे मत देखील वावरे यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
कसा केला गृहप्रवेश विधी?
यावेळी गृहप्रवेश करताना दीपक वावरे यांनी विधवा महिलांना आदरपूर्वक आमंत्रण दिले. नव्या वास्तूचा गृहप्रवेश करताना सात सुवासिनींचे पूजन करून त्यांना जेवण वाढण्याची परंपरा आहे. मात्र दीपक यांनी या सर्व विधवा महिलांचे पाद्यपूजन करवून घेतले. मग सुरुवातीला त्यांना जेवायला वाढून मगच गृहप्रवेश कार्य पूर्ण केले.
advertisement
दरम्यान, सध्या समाजात विधवा महिलांना विशेष असा सन्मान कधीच मिळत नाही. मात्र दीपक वावरे यांच्या या कृतीमुळे शुभकार्यावेळी सुवासिनींना मिळणारा मान त्यांना मिळाल्यामुळे सर्व जमलेल्या विधवा महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव दिसत होता. मिळालेल्या या सन्मानामुळे काही महीलांना आनंदाश्रूही अनावर झाले होते.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 09, 2023 12:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
गृह प्रवेशाला विधवांना मान, शाहूनगरीत प्रबोधनाचा नवा आदर्श, Video