सातारा: आपल्याकडे गावोगावी अनोख्या प्रथा आणि परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी अशीच अनोखी परंपरा सातारा जिल्ह्यातील सुखेड-बोरी या गावात गेल्या 200 वर्षांपासून सुरू आहे. दोन्ही गावच्या महिला ओढ्याच्या काठी समोरा-समोर येतात आणि एकमेकींना तुफान शिवीगाळ करतात. हातवारे करून एकमेकींच्या अंगावर जाण्यापर्यंत प्रकरण जातं. दोन्ही गावच्या शेकडो महिलांमध्ये हा सामना रंगतो. यालाच बोरीचा बार असं देखील म्हटलं जातं. याच परंपरेबाबत आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुखेड व बोरी ही शेजारी गावे आहेत. येथील बोरीचा बार राज्यात प्रसिद्ध आहे. यंदाही नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी परंपरागत पद्धतीने बोरीचा बार उत्साहात पार पडला. दोन्ही गावच्या महिला सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर आल्या आणि एकमेकींकडे बघून हातवारे करत जोरदार शिवीगाळ सुरू झाली. शिव्यांची लाखोली वाहण्याची पूर्वापार परंपरा यंदाही येथील महिलांनी कायम ठेवली.
मूलबाळ होत नसेल तर केला जातो नवस, मराठवाड्यातील सक्रोबा पूजा माहितीये का?
कसा असतो बोरीचा बार?
बोरीचा बार सुरू होताना दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात. त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होत असतो. हा बोरीचा बार होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढतो.
बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र येतात. तेथून त्या झिम्मा, फुगडी खेळत आणि फेर धरत ओढ्यापर्यंत जातात. ओढ्याच्या काठावर उभे राहून पैलतीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करतात. शिव्यांची लाखोली वाहत साजरा होणार बोरीचा बार पाहायला महाराष्ट्रभरातून लोक येतात.
महाराष्ट्रातलं 'हे' संपूर्ण गावच आहे शाकाहारी, लग्नानंतर मुली सोडतात मांसाहार
बोरीच्या बारची आख्यायिका
सुखेडच्या पाटलांना दोन पत्नी होत्या. एक सुखेड आणि दुसरी बोरी गावची होती. एक पत्नी सुखेड मध्ये राहत होती आणि दुसरी बोरी या गावी राहत होती. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी या पाटलांच्या पत्नीमध्ये कपडे धुवत असताना सुखेड आणि बोरी यांच्या गावाच्या हद्दीवरून वाहणाऱ्या ओढ्यावर भांडणे सुरू झाली. यावेळी दोघींनी एकमेकांना शिव्यांचा भडीमार केला. यावेळी भांडणादरम्यान या ओढ्याच्या पाण्यामध्ये त्या वाहून गेल्या. तेव्हापासून या बोरीचा बारला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासून दोन्ही गावच्या महिला वेशीवर येऊन एकमेकींना शिव्या देऊन ही परंपरा पुढे चालू ठेवत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.





