महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं. मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष पद भुषवलं होतं. त्यानंतर त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिचड यांनी आपल्या मुलासह प्रवेश केला होता. पण, 2019 च्या निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला. त्यानंतर पिचड यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली होती. पण, अशातच मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात दाखल केलं होतं. त्यांच्यावर दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. आज दुपारी पिचड यांची प्रकृती खालावली. संध्याकाळी त्यांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. पिचड यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
मधुकर पिचड यांच्यावर थोर विचारवंत व स्वातंत्र्य सैनिक प्रा. ग. प्र. प्रधानांशी यांच्या विचारांचा पगडा होता. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करावे म्हणून प्रोत्साहन मिळाले. त्यांच्याच प्ररणेने नोकरीच्या फंदात न पडता सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. सर्वात आधी पिचड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. महाविद्यालयात असतांनाच आदिवासी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आंदोलनात सक्रीय सहभागी झाले होते. १९६१ ला त्यांनी लढा दिला होता.
त्यानंतर सहकारी तत्त्वावर पहिली दूध संस्था राजूर इथं पिचड यांनी काढला होता., पहिल्या दिवशी २५ ते ३० लिटर दूध गोळा झाले. पुढे हाच धंदा तालुक्याचा प्रमुख बनला. आज तालुक्यात २ लाख लिटर दूधाचे संकलन होत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना, याच संस्थेच्या अनेक आश्रमशाळा, माध्यमिक शाळा, वसतीगृहे आहेत. अकोले तालुक्यात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसची पाळमुळे रोवण्यात पिचड यांची महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेस हा व्यापारी धनीकांचा पक्ष आहे ही प्रतिमा त्यांनी नाहीशी केली आणि सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच्या प्रवाहात आणलं होतं. पुढे त्यांचा प्रवास हा राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपमध्ये येऊन थांबला.
मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास
- अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड
- १९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड
- १९८० पासून २००९ पर्यंत सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले
- १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
- राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती
- मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिलाय.
- राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले
- २०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.
- मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली
- मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला
- आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती.