राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून भूकंप घडणार असल्याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतील काही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचे दावे करण्यात येतात. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सोलापूरमधील करमाळामध्ये शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने संघटनबांधणीला वेग दिला आहे. याच अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. कदम पुढे म्हणाले, “जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदेसेनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने निवडून आले, तर पक्षाचे जनाधार दृढ होईल. त्याचाच परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीत दिसून येईल आणि जिल्ह्यात आमदारांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढेल,” असे ते म्हणाले.
advertisement
पवार गटाच्या आमदाराची उपस्थिती...
शिवसेना शिंदे गटाची ही संघटनात्मक पातळीवर बैठक होती. मात्र, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार नारायण पाटील यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. शिंदे गटाच्या बैठकीत पवार गटाच्या आमदाराची उपस्थिती दिसल्याने चर्चांना उधाण आले. त्याआधी मोहोळमध्ये झालेल्या बैठकीत पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी सहभाग नोंदवला.
शिंदेंच्या नियमित संपर्कात...
आमदार नारायण पाटील यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आमदार आहे. मात्र, तरी एकनाथ शिंदे हा कामाचा माणूस आहे. त्यामुळे मतदारसंघातील कामासाठी माझा एकनाथ शिंदे यांच्याशी नियमित संपर्क आहे असे आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. मात्र, पाटील यांनी थेट शिवसेनेच्या बैठकीत उपस्थिती दाखवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.