उद्या, सोमवारी 15 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून आज वर्तमानपत्रांत दिलेली जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे. “देवा तूच सांग…” या शीर्षकाखाली दिलेल्या या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर राज्यभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “देवा भाऊ” अशा आशयाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाचे फलक व जाहिराती लागल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून शरद पवार गटाने आजची जाहिरात प्रसिद्ध केल्याचे बोलले जात आहे.
advertisement
या जाहिरातीतील मजकूर आणि मांडणीवरून फडणवीस यांना उपरोधिक टोला लगावण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, उद्या होणाऱ्या नाशिक मोर्चाच्या आधीच या जाहिराती प्रसिद्ध झाल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
या जाहिरातीमध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमान, पिकाला हमीभाव, भावांतर योजना, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, रोजगार, कांदा निर्यात बंदी आदी विविध मुद्यांकडे जाहिराताच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शरद पवार गटाच्या या पावलामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणारी राजकीय चकमक आणखी तीव्र होणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पवार गटाचे आज शिबीर...
सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शरद पवार गटाच्या या शिबीराकडे पाहिले जात आहे. नाशिकमधील मोर्चादेखील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जात आहे.