मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रीरामपूरमध्ये प्रचार सभा होणार होती. मात्र, ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे थेट रुग्णालयात दाखल झाले आहेत. मु्ख्यमंत्र्यांची नियोजित सभा ऐनवेळी रद्द झाल्याने त्यांचा रक्तदाब ऐनवेळी वाढला. सध्या माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर श्रीरामपूर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
advertisement
माझ्या नेत्यांचा माझ्यावर दबाव....
भाऊसाहेब कांबळे यांनी म्हटले की, जिल्ह्यातील काही नेत्यांचा माझ्यावर दबाव होता. मला उमेदवारी देणारे हेच लोकं आहेत आणि मागे घेण्यास सांगणारी हीच मंडळी आहेत. भाऊसाहेब कांबळे यांनी नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, पक्षाने मला एबी फॉर्म दिला. त्यामुळे मी धनुष्यबाणाची उमेदवारी करणारच. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले असते तर मी माघार घेतली असती. पण तसे झाले नाही. मतदारसंघातील सर्वसामान्य जनता माझ्यासोबत असून मी निवडणूक लढवणारच असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
श्रीरामपूरमध्ये महायुतीचे दोन उमेदवार...
श्रीरामपूर विधानसभेत महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे यांची उमेदवारी कायम आहे. तर, अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसने श्रीरामपूरमधून उमेदवारी न दिल्याने कानडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. निवडणूक अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत जागेचा पेच न सुटल्याने महायुतीमध्ये या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
