पुणे : माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता झाला आहे. यानंतर पोलीस कंट्रोल रूमला अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाली. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर तानाजी सावंत हे लगेच पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत. दरम्यान पोलिसांकडून तानाजी सावंत यांच्या मुलाची शोधाशोध सुरू झाली, पण पोलीस तपासात या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला.
advertisement
कौटुंबिक वादातून तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून तानाजी सावंत यांचा मुलगा दुपारी सव्वाचार वाजता घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो चार्टर फ्लाईटने बँकॉकला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या सगळ्या प्रकरणात तानाजी सावंत यांनी त्यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली गेली होती. पण प्राथमिक माहितीनुसार ऋषीराज सावंत याचे घरी काही वाद झाले होते, यानंतर तो बँकॉकला गेल्याचं समजतंय. यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे, तसंच तानाजी सावंत सतत पोलिसांच्या संपर्कात आहेत.
ऋषीराज सावंत बँकॉकला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्यामुळे पोलिसांकडून विमान कंपनीशी संपर्क साधला जात आहे. बँकॉकला जाणारं हे चार्टर प्लेन भारताच्या हद्दीत असेल तर भारतातल्या विमानतळावरच उतरवलं जाणार आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.