दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावात राहणारे शेतकरी तात्यासाहेब मधुकर गायकवाड यांना 14 एकर शेती आहे. त्यांनी 4 एकर कांदा, 4 एकर भोपळा आणि 6 एकर क्षेत्रात द्राक्ष बागेची लागवड केली होती. सोलापूर जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततचा पाऊस आणि नदीला आलेला पूर यामुळे त्यांच्या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे.
advertisement
4 एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड करण्यासाठी त्यांना सुमारे दीड लाख रुपये खर्च आला होता. एकरी सव्वा लाख रुपये उत्पन्न कांदा पिकातून मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. पण, आता चार एकर कांदा हा पाण्यात वाहून गेला आहे. पाण्यासोबत शेतातील माती देखील वाहून गेली आहे. भोपळ्याच्या लागवडीसाठी एकरी 15 हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. त्यातून एकरी 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित होतं. अतिवृष्टीमुळे भोपळ्याच्या पिकात पाणी साठलं आहे.
गायकवाड यांनी 14 लाख रुपयांचं कृषी कर्ज काढून 6 एकर क्षेत्रात द्राक्ष बागेची लागवड केली होती. पण, अतिवृष्टीमुळे यावर्षीचा द्राक्ष बागेचा हंगाम संपूर्ण वाया गेला आहे. 6 एकरात द्राक्ष बाग लागवडीसाठी 9 लाखांचा खर्च आला होता. अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे अतोनात नुकसान झाल्याने एकही पिक हाती येणार नाही. आता बँकेचे हप्ते कसे भरायचे? हा प्रश्न गायकवाड यांना पडला आहे. सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करून शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.