परिस्थिती इतकी भीषण आहे की रस्त्याला अगदी नदीचं स्वरुप आलं आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने गाड्याही पुढे जाऊ शकत नाहीत. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे, ज्यामुळे कोंडी आणखी वाढली आहे. शहर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने विडी घरकुल, दहीटणे, शेळगी, अक्कलकोट रोड यांसारख्या अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे.
advertisement
या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी स्वतः या भागांना भेट दिली आहे. वाढलेल्या पाणी पातळीमुळे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील अनेक शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोलापूर ते होटगी रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे, कारण होटगी सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. रस्त्यावरील कठड्यांचे बांधकामही या पाण्यामुळे वाहून गेले.
होटगी, होटगी स्टेशन, आहेरवाडी, फताटेवाडी, इंगळगी, औज, शिरवळ आणि जेऊर यांसारख्या भागातून सोलापूरला जाणाऱ्या नागरिकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आणि झुवारी सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या गाड्या याच मार्गाचा वापर करतात. रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून, नागरिकांची गैरसोय होत आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोलापुरात पुढचे 24 तास अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर जे अडकले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे.