दरम्यान, आरोपी नर्तिका पूजा गायकवाडचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती ब्रेक अप बद्दल बोलताना दिसत आहे. आपल्याला ब्रेक अप करायचा आहे. तुझ्यासारखे माझ्याकडे चार आहेत, असंही ती रीलमध्ये बोलताना दिसत आहे. बर्गे यांनी आत्महत्या केल्यानंतर पूजाचा हा जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर सोशल मीडियात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.
advertisement
व्हिडीओमध्ये नक्की काय आहे?
खरं तर, पुजाचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका रिल्सचा भाग आहे. ज्यात पूजा 'मला तुझ्याशी ब्रेक अप करायचं आहे' असं म्हणताना दिसत आहे. त्यावर पुरुषाच्या आवाजात एकजण म्हणतो, "तुला ब्रेक अप करायचा आहे ना... तर कर... पण तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे गाडी आहे. बंगला आहे. दौलत आहे. शोहरत आहे. तुझ्याकडे काय आहे?" यावर पूजा म्हणते, "माझ्याकडे तुझ्यासारखे चार आहेत." अशा संभाषणाचा हा जुना व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या रिलचा संबंध उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येशी देखील जोडला जात आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
बुधवारी सकाळी सासुरे गावात पूजा गायकवाड हिच्या घरासमोर एक गाडी उभी होती. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर गोविंद बर्गे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. त्यांनी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून घेतल्याचं दिसत होतं. गोविंद बर्गे आणि नर्तिका पूजा यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून ओळख होती. गोविंद बर्गे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत.
सोन्या-चांदीचे दागिने, दोन लाखांचा फोन
गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोविंद बर्गे यांचे पूजावर प्रेम होते. त्यांनी पूजाला सोन्या-चांदीचे दागिने आणि 2 लाख रुपयांचा महागडा मोबाईल फोनही भेट दिला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि गोविंद यांच्यात संपर्क नव्हता. या कारणावरून गोविंद अस्वस्थ होते. पूजा त्यांच्या जवळ घर नावावर करण्यासाठी तगादा लावत होती, असंही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याच कारणामुळे गोविंद बार्शी तालुक्यातील सासुरे येथे पूजाच्या घरासमोर आले आणि त्यांनी स्वतःला संपवलं. त्यांनी उजव्या कपाळावर गोळी झाडून घेतली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पूजा गोविंद यांना ब्लॅकमेल करत असावी, यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा सविस्तर तपास वैराग पोलीस करत आहेत.