सोलापूर : बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला अंघोळ घातली जाते. त्यांना सजवले जाते आणि त्यांनी पूजा केली जाते. तशाच प्रकारे सोलापूर शहरात गाढवांची पूजा केली जाते. या सणाला कारहूवानी सण असे म्हणतात. सोलापूर शहरातील लष्कर या भागात गाढवांची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच या पोळ्याच्या दिवशी गाढवांकडून कोणताही काम करून घेतला जात नाही.
advertisement
सोलापूर शहरातील लष्कर हा परिसर गाढवांच्या पोळ्यासाठी प्रसिद्ध आहे. हा गाढवांचा पोळा 40 ते 45 वर्षापासून साजरा केला जात आहे. या दिवशी गाढवांची रंगरंगोटी करून त्यांना सजवले जाते. यामुळे गाढवांना दोन दिवसांची विश्रांती मिळते. गाढवांना साजशृंगार करून पुरणपोळी, कुरडया, पापड-भजी यांसारखे स्वादिष्ट पदार्थ दिले जातात.
पूर्वी शेकडो गाढव पोळ्याच्या तोरणाखाली असायचे. आता ही संख्यादेखील कमी झाली आहे. गाढवांकडून कुंभार समाजासह गाढव मालक कामे करून घेतात. गाढवाच्या मालकांसाठी हा गाढव हे त्यांच्या उपजिविकेचे साधनच आहे. त्यामुळे गाढवाची वर्षांतून एकदा पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घातले जाते. मागील 45 वर्षापासून ही परंपरा जपली जात आहे.
भारतीय संस्कृतीत प्राणीमात्रांविषयी, विशेषतः उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या प्राण्यांविषयी असलेला सद्भाव हा यांसारख्या विविध सण आणि उत्सव यांद्वारे पाहावयास मिळतो. त्याचेच उदाहरण म्हणजे लष्कर परिसरात साजरा करणार गाढवांचा पोळा!