सोलापूर : महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. वर्षभर लाखो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. मात्र, महाराष्ट्रातील आणखी एक ठिकाण आहे, ज्याला मिनी महाबळेश्वर असे म्हटले जात आहे. याठिकाणी माळरानावर नंदनवन फुलल्याने या ठिकाणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला आढावा.
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चिंचणी गाव पुनर्वसित असून सुरुवातीला अगदी माळरान होते. याच माळरानावर संघर्ष करत गावकऱ्यांनी झाडांचे नंदनवन फुलवले आहे. या गावात 10 ते 12 हजार वेगवेगळी झाडे आहेत. गावाला ग्रामीण कृषी पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याठिकाणी हजारो पर्यटक भेट देत आहेत. या गावाने माळरानावर झाडांचे नंदनवन कसे फुलवले, हे जाणून घेऊयात.
advertisement
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या छोट्या विस्थापित गावाने वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. संपूर्ण गावाने उभारलेले व गावकऱ्यांकडून चालवले जाणारे राज्यातील अशा स्वरूपाचे हे पहिलेच केंद्र असावे. लोप पावत चाललेली ग्रामीण जीवनशैली, परंपरा, खाद्यसंस्कृती, वृक्ष, झाडी, निसर्गाचे सानिध्य यांचा पुरेपूर प्रत्यय आणि आनंद चिंचणीने पर्यटकांना वाटण्यास सुरुवात केली आहे.
आधुनिक काळातील सावित्री, नवऱ्याला किडनी देत दिले जीवनदान, पती-पत्नीच्या प्रेमाची अनोखी गोष्ट!
सुमारे 65 कुटुंबे आणि 375 लोकसंख्येचे चिंचणी गाव आहे. पुनर्वसनात प्रत्येक कुटुंबाला राहण्यासाठी 12 गुंठे जागा आणि 2 एकर शेती मिळाली. गावातील मोहन अनपट यांच्यासारखं धडाडीचं, निःस्वार्थी आणि प्रत्येक उपक्रमात पुढाकार घेणारं नेतृत्व चिंचणीला मिळाले.
चिंचणी गाव हे महाबळेश्वरासारखेच बहरले असून ही जागा निसर्गरम्य बनवण्यासाठी 15 एकरांच्या गावठाणात तब्बल 10 हजार झाडांची वनराई फुलवण्यात आली आहे. शासनाने त्याची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गावाला सन्मानित करण्यात आलं आहे.
प्रत्येक चिंचणीकरांच्या घरासमोर आंबा, जांभूळ, सीताफळ, पेरू, चिकू, नारळ, जंगली, वनौषधी झाडे लक्ष वेध आहेत. निसर्गरम्य वातावरणातील जिल्हा परिषदेची शाळा, सार्वजनिक वाचनालय, घसरगुंडी, झोके आदी खेळाचे विविध साहित्य पाहण्यास मिळते.
गावातील घरे आणि इतर सार्वजनिक इमारती म्हणजे शाळा, मंदिरे किंवा ग्रामपंचायत इमारत पाहताच क्षणी नजरेत भरणारी आहेत आणि गावातील असणारी गर्द झाडी ही त्या जागेची, इमारतीचे सौदर्य वाढविण्यासाठी हातभार लावत आहेत. सध्या हे गाव एक आदर्श गावाचे मॉडेल म्हणून सर्वत्र चर्चिले जात आहे.