दीड वर्षांपासून ओळख अन् जडलं प्रेम
बुधवारी सकाळी सासुरे गावात पूजा गायकवाड हिच्या घरासमोर एक गाडी उभी होती. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर गोविंद बर्गे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. त्यांनी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोविंद बर्गे आणि नर्तिका पूजा यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून ओळख होती. गोविंद बर्गे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत.
advertisement
सोन्या-चांदीचे दागिने, दोन लाखांचा फोन
गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोविंद बर्गे यांचे पूजावर प्रेम होते. त्यांनी पूजाला सोन्या-चांदीचे दागिने आणि 2 लाख रुपयांचा महागडा मोबाईल फोनही भेट दिला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि गोविंद यांच्यात संपर्क नव्हता. या कारणावरून गोविंद अस्वस्थ होते. पूजा त्यांच्या जवळ घर नावावर करण्यासाठी तगादा लावत होती, असंही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याच कारणामुळे गोविंद बार्शी तालुक्यातील सासुरे येथे पूजाच्या घरासमोर आले आणि त्यांनी स्वतःला संपवलं. त्यांनी उजव्या कपाळावर गोळी झाडून घेतली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पुजाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पूजा गायकवाड हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.