संतोष पाटील यांच्या घरी पूर्वी कोणताही पाळीव प्राणी नव्हता. त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांनी त्यांना संगोपनासाठी गायीचे वासरू दिले. त्या वासराचे नाव त्यांनी ‘मयुरी’ असे ठेवले. मयुरीला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच जपले. तिच्या संगोपनात पाटील कुटुंबाने माया आणि आपुलकीची भावना जपली. मयुरी गरोदर राहिल्यानंतर तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय पाटील कुटुंबीयांनी घेतला.
advertisement
Success Story : शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, 10 गुंठ्यात केली लसणाची लागवड, दीड लाखांचा मिळाला नफा
कसं केलं डोहाळे जेवण?
डोहाळे जेवणाच्या दिवशी मयुरीला अंघोळ घालून स्वच्छ सजवण्यात आले. तिच्या शिंगांना रंग लावण्यात आला तसेच फुलांच्या माळांनी तिला सजवले. अंगणात सुंदर रांगोळी काढून पारंपरिक लोकगीतांच्या सुरावटीत मयुरीची ओटी भरली गेली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तिच्यासाठी तयार करण्यात आलेला खास नैवेद्य. पुरणपोळी, हिरवा चारा आणि ताजी फळे प्रेमाने खाऊ घालण्यात आली.
विशेष म्हणजे ‘मयुरी’च्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांसाठी पै-पाहुणे आणि आया-बाया देखील जमल्या होत्या. या सगळ्यांनी आरती करून मयुरीला आशीर्वाद दिले. उपस्थित ग्रामस्थांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मुक्या प्राण्याप्रती दाखवलेली ही आपुलकी आणि जिव्हाळा पाहून पाटील कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या धावपळीच्या काळात भूतदयेचा आणि संवेदनशीलतेचा हा आदर्श संदेश ठरत आहे.





