सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे सोलापूर शहरातून जाणारे तिन्ही महामार्ग बंद करण्यात आले आहेत. सोलापूर - विजयपूर, सोलापूर - कोल्हापूर आणि सोलापूर - पुणे या महामार्गांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
तिन्ही महामार्ग बंद
सोलापूर – पुणे महामार्गावर लांबोटी नजीक पाणी आले असून त्यामुळे रात्री 11.30 वाजलेपासून या ठिकाणाहून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर आज सकाळपासून सोलापूर विजयपूर मार्ग बंद करण्यात आला आहे. तर तिऱ्हे येथे सीना नदीच्या पुरामुळे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर पाणी आले असून या मार्गावरील वाहतूक देखील थांबवण्यात आली आहे.
वाहनांच्या रांगा
सोलापूर - विजयपूर महामार्ग पाण्याखाली गेला आहे. नदीपासून 2 ते 3 किलोमीटर पर्यंत म्हणजेच अगदी हत्तुर गावापर्यंत पाणी आलेले आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली असून जवळपास 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर महामार्गावर असलेले विजेचे खांब देखील तारेसह पाण्याखाली गेले आहे. जो पर्यंत सीना नदीची पाण्याची पातळी कमी होत नाही, तोपर्यंत सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त हसन गौहर यांनी सांगितले.