सोलापूर : आता जेमतेम 1 महिना आणि 1 आठवडा, मग घरोघरी आगमन होईल बाप्पाचं. चौका-चौकातही गणेशोत्सवानिमित्त आनंदाचं वातावरण असेल. आपण माहित असेल तर विदेशातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी भारतातून बाप्पाच्या सुबक मूर्ती नेल्या जातात. आता बाप्पा चक्क बँकॉकला निघाले आहेत.
सोलापूरच्या नीलम नगर परिसरात असलेल्या साई आर्ट्समधील गणेश मूर्ती बँकॉक आणि लंडनला नेण्यात आली. 2 फुटांच्या सुमारे 400 मूर्ती जहाजामार्गे गणेशोत्सवासाठी परदेशात पाठवण्यात आल्या. तिथं गणेशभक्त त्यांची आतुरतेनं वाट पाहत असतील.
advertisement
हेही वाचा : बाप्पाच्या नावासोबत 'मोरया' का म्हणतात बरं? पुण्याशी आहे संबंध
साई आर्ट्समधील बाप्पाची मूर्ती अत्यंत मनमोहक आणि सुबक असते असं भाविक सांगतात. मागील वर्षी देश-विदेशात या मूर्तींना मोठी मागणी होती, यंदासुद्धा आहे. त्यामुळे दर्जेदार पॅकिंग करून सोहळ्याच्या एका महिन्याआधीच मूर्ती पाठवण्यात आल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री रामलल्ला, संत तुकाराम महाराज, बालगणेश, अशा विविध रूपातील बाप्पा मूर्तीकारांनी साकारला आहे. मधुकर कोकुल, बालाजी श्रीराम, अंबादास दोरणा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी ही किमया केली.
बाप्पाचं रूप कधीही, कुठेही पाहिलं तरी मन प्रसन्न व्हावं एवढा जिवंतपणा मूर्तीत आणण्याचं काम मूर्तीकार करतात. वर्षभर मूर्ती साकारण्यात ते व्यस्त असतात. गणेशोत्सव जवळ आल्यावर रात्रंदिवस मूर्तीला रंग दिले जातात.
पूर्वी सोलापूरच्या गणेश मूर्तींना केवळ महाराष्ट्रासह दक्षिण भारतात मागणी होती. परंतु आता देश-विदेशातही बाप्पाच्या इथल्या मूर्तींना विशेष मागणी असते, असं साई आर्ट्सचे मालक मधुकल कोक्कुल यांनी सांगितलं.