लोकनाट्य कला केंद्रात नृत्यांगणांची बैठक लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर गावठी बंदुकीने पायावर गोळी झाडण्यात आली आहे. यात एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.९) मध्यरात्री घडली आहे. या गोळीबारात वाखरी (ता. पंढरपूर) येथील देवा बाळु कोठावळे (वय २७, व्यवसाय लॉज) गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या मांडीत गोळी घुसली आहे. याप्रकरणी सूरज पवार (रा. पंढरपूर) आणि त्याच्या तीन अनोळखी मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना टेंभुर्णीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वेणगाव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रामध्ये घडली.
advertisement
जखमी देवा कोठावळे याच्या फिर्यादीनुसार, तो मित्र ज्ञानेश्वर बंदपट्टे, वैभव ननवरे आणि सचिन सांळुखे माढा तालुक्यातील वेणेगाव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात आले होते. त्याच वेळी संशयित आरोपी आरोपी सूरज पवार हाही तिथे आला होता. कला केंद्रात डान्सची बैठक लावण्यासाठी येथील मालकाकडे मागणी केली असता मालकाने अर्धा तास राहिला, म्हणून सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर बंदपट्टे याने दोन्ही ग्रुपची मिळून एकच बैठक लावल्यानंतर आपले पैसे वाचतील असे म्हणाला. यावेळी आरोपी सूरज पवार याला राग आला आणि 'तू मला काय भुरटा समजतो काय?' म्हणून शिवीगाळ करू लागला.
हा वाद वाढत असताना सर्वजण कला केंद्राच्या पार्किंगकडे गेले. यावेळी फिर्यादी देवा कोठावळे याने वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सूरज पवार याच्या बरोबर असलेल्या तिघांपैकी एकाने फिल्मी स्टाईलने आपल्या कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून कोठावळेच्या पायावर फायरींग केली. या फायरींगमध्ये गोळी डाव्या पायाच्या मांडीमध्ये घुसून तो जखमी झाला.
त्यास तातडीने टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटना समजतात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पाहणी केली. याप्रकरणी आरोपी सूरज पवारसह त्याच्या तीन साथीदारांविरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांना घटनास्थळी गोळीची रिकामी पुंगळी सापडली आहे. पुढील तपास टेंभूर्ण पोलीस करत आहेत.