दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे गावात राहणारे शिवाजी तुरबे यांच्याशी 15 वर्षांपूर्वी भाग्यश्री यांचा विवाह झाला आहे. हसत-खेळत दोघेजण मिळून संसाराचा गाडा हाकत होते. काही दिवसांनंतर शिवाजी तुरबे हे नेहमी आजारी पडत होते. उलट्या होणे, पायाला सूज येणे, मळमळणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे त्यांना सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
advertisement
वटपौर्णिमेच्या दिवशीच हरपलं सौभ्याग्य, पोलीस पत्नीवर दुर्दैवी वेळ, त्या घटनेनं सारं संपलं!
सोलापुरातील एका रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या किडनीवर सूज आल्याचे सांगितले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दोन्ही किडन्या निकामी झाल्या. घरातील कर्त्या पुरुषाला असे झाल्याचे कळताच कुटुंबातील सर्वांना धक्का बसला. तर दुसरीकडे दिवसेंदिवस शिवाजी यांची प्रकृती खालावत चाललेली होती.
पत्नीने दिली किडनी
शिवाजी तुरबे यांना दुसऱ्या किडनीची आवश्यकता होती. तर डॉक्टरांनी दुसरी किडनी मिळणे अशक्य असल्याचे सांगितले. तेव्हा शिवाजी यांची पत्नी भाग्यश्री यांनी आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केली तेव्हा भाग्यश्री यांचा रक्तगट 'ओ पॉझिटिव्ह' निघाला आणि ती किडनी शिवाजी यांना चालणार असे सांगितले.
सोलापूर शहरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. माझ्या पत्नीने मला किडनी देऊन मला नवीन जीवनदान दिल्याचे शिवाजी तुरबे सांगतात. पतीला किडनी देणाऱ्या पत्नी भाग्यश्री तुरबे यांचे भंडारकवठे गावासह सर्वत्र कौतुक होत आहे.