याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या विनंतीनुसार राज्य सरकारने तळोजाजवळील करवले गाव येथे सुमारे 52.10 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी सुमारे 39.90 हेक्टर शासकीय जमीन असून 12.20 हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे. याठिकाणी कचऱ्यावर शास्त्रोक्तरित्या प्रक्रिया व विल्हेवाट लावण्याचा प्लँट उभा केला जाईल. शासनाच्या जमिनीपैकी 38.871 हेक्टर जमिनीचा ताबा 18 जानेवारी 2016 रोजी महापालिकेला मिळाला आहे. खासगी जमिनीची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जमीन डिसेंबर 2025पर्यंत महानगरपालिकेच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
advertisement
मुंबई शहर व उपनगरांत दररोज सरासरी सुमारे साडेसहा हजार मेट्रिकपेक्षा जास्त कचरा जमा होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महापालिकेकडे सध्या जागाच नाही. मुंबईकडे देवनार व कांजूरमार्ग हे दोनच डम्पिंग ग्राउंड आहेत. यापैकी देवनार डम्पिंग ग्राउंडची कचरा साठवण क्षमता संपली आहे. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे निर्देश हाय कोर्टाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील कचरा टाकायचा कुठे? अशा प्रश्न महापालिकेसमोर होता. विशेष म्हणजे देवनार येथील कचरा स्वच्छ करून हा भूखंड अदानी समूहाला देण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत.
अंबरनाथमध्येही होणार डम्पिंग ग्राउंड
मुंबईतील कचरा टाकण्यासाठी अंबरनाथ येथे सुमारे 18 हेक्टर क्षेत्रफळ असलेली जागा राज्य सरकारने मुंबई महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणच्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.