असंवेदनशीलतेचा कहर, सुप्रिया सुळेंची टीका
शेतकरी भिकारी नाही तर शासन भिकारी आहे, असं वक्तव्य कोकाटे यांनी केलं होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
advertisement
'भिकारी' म्हणत कळस गाठला - सुप्रिया सुळे
एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
रोहित पवारांची टीका
विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.