पुणे : शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत घरातून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यानंतर तानाजी सावंत यांनी पुण्याच्या सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता, पण याप्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. तानाजी सावंत आणि पुण्याच्या पोलिसांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या सगळ्याचा घटनाक्रम सांगितला आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र पुणे विमानतळावरून विमानाने निघाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
advertisement
काय म्हणाले पोलीस?
'चार वाजता तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी घेऊन गेल्याची तक्रार मिळाली, त्यानंतर टीम ऍक्टिव्ह झाली. पुण्याहून फ्लाईटने ते गेले आहेत, फ्लाईट कोणत्या दिशेने चालली आहे, याची माहिती घेत आहोत. सिंहगड पोलीस स्टेशनला किडनॅपिंगची तक्रार दाखल करण्यात आली. क्राईम ब्रांचची टीम तपास करत आहे', असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया
'बेपत्ता का किडनॅपिंग असं काही नाहीये, त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही आहेत. घराबाहेर पडताना आमच्याकडे सांगितलं जातं. साधं वाकडला जातानाही सांगितलं जातं. दिवसातून त्याचे 15 वेळा फोन येतात, पण यावेळी त्याने स्वत:ची गाडी घेतली नाही, दुसऱ्या गाडीने गेला. फोन न करता मुलगा घरातून गेला होता. त्यामुळे आम्ही काळजी म्हणून तक्रार केली. ड्रायव्हर गेला होता, त्याने सांगितलं विमानतळावर सोडलं, त्यामुळे आम्हाला समजलं. संपर्क झाला नाही म्हणून मी अस्वस्थ झालो. स्पेशल चार्टर प्लेन आहे का साधं विमान आहे, याबाबत आम्हाला अजून माहिती मिळालेली नाही', अशी प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे.
कौटुंबिक वादातून घरातून गेला?
शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा घरातून गायब झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. पुणे विमानतळावरून तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं, यानंतर तानाजी सावंत यांनी मुलाचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली होती, पण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाला वेगळा ट्विस्ट आला.
घरामध्ये वाद झाल्यामुळे ऋषीराज सावंत दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला. यानंतर तो स्पेशल चार्टर फ्लाईटने बँकॉकला निघाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन 2000 एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाले. तानाजी सावंत यांनी मुलगा हरवल्याची तक्रार दिल्यानंतर आता बँकॉकला जाणारं हे विमान चेन्नईला उतरवण्यात येणार आहे. ऋषीराज सावंत यांच्यासोबत त्यांचे दोन मित्र प्रवीण आणि संदीपही होते. हे तिघेही पुण्याहून स्पेशल चार्टर विमानाने बँकॉकला निघाले होते.
मुलगा घरातून निघून गेल्याचं समजताच तानाजी सावंत आणि त्यांचा मोठा मुलगा सीपी ऑफिसला पोहोचले. तानाजी सावंत यांनी सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासोबत चर्चा केली.