मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनी एका खासगी कोचिंग क्लासला जायची. त्याच कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीला वेगवेगळ्या प्रकारची आमिषं दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिली. बदनामीच्या भीतीतून त्याने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्या अधिक प्रमाणात खाल्ल्याने प्रकृती बिघडल्यानंतर तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
advertisement
संदेश गुंडेकर (२७, रा. ढाणकी) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याचा उमरखेड तालुक्यात कोचिंग क्लास आहे. पीडित विद्यार्थिनी गेल्या काही वर्षांपासून त्याच्याकडे शिकवणीसाठी येत होती. गुंडेकर याने तिला वेगवेगळे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. गुंडेकर याने बदनामी होऊ नये म्हणून चार महिन्यांच्या गर्भवती विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्यांचा डोस अधिक झाल्याने तिची प्रकृती बिघडली.
अधिक प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने तिला पुसदच्या खासगी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हे अवैध गर्भपाताचे प्रकरण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच याची माहिती पुसद पोलिसांना दिल्यावर पोलीस निरीक्षक पथकासह रुग्णालयात आले. त्यांनी मुलीचा जबाब नोंदवून घेऊन शिक्षक गुंडेकर याच्याविरोधात रविवारी रात्री पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडितेची प्रकृती जास्त बिघडल्याने तिला नांदेड शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.