उल्हासनगर कॅम्प क्र. 2 मधील नेहरू चौक ते शिरू चौक हा परिसर दिवाळी सणात सर्वाधिक गर्दीचा असतो. या भागात जपानी मार्केट, गजानन मार्केट, अमन रोडवरील फटाके आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची घाऊक दुकाने आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांच्या खरेदीसाठी येथे प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. परिणामी या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते आणि नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन वाहतूक विभागाने या वर्षी आधीच नियोजन करत वाहतूक नियंत्रणाचे नियम लागू केले आहेत.
advertisement
असे असतील पर्यायी मार्ग
या निर्णयानुसार अमन रोडकडून नेहरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पटेल मार्ट चौक येथे प्रवेशबंदी राहील. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून पटेल मार्ट येथून डावीकडे वळून हिरा मॅरेज हॉल ,मधुबन चौक गोल मैदान या मार्गाने पुढे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच नेहरू चौकाकडून शिरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही दुचाकी वगळता इतर सर्व वाहनांना नेहरू चौक येथे प्रवेशबंदी राहील. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून नेहरू चौकातून देवीभवानी चौक,गोल मैदान,उल्हासनगर नं. 1 मार्ग वापरता येईल.
लोडिंग-अनलोडिंगच्या वेळांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. दुपारी 12.30 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत दोन्ही रस्त्यांवर लोडिंग-अनलोडिंगसाठी प्रवेश बंद राहील.मात्र,रात्री 12.01 ते दुपारी 12.30 या वेळेत व्यापाऱ्यांना वस्तू उतरविण्यास परवानगी असेल.
ही अधिसूचना 10 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत प्रभावी राहणार असून पोलिसांकडून रोज मार्ग निरीक्षण, वाहतूक मार्गदर्शन आणि नियंत्रण व्यवस्था ठेवली जाणार आहे. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलिस वाहने आणि अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.
पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दिवाळीच्या खरेदीदरम्यान वाहतुकीचे नियम पाळावेत, अनावश्यक ठिकाणी वाहन उभे करू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे शिवाय वाहतूक शिस्त पाळल्यास खरेदीचा आनंद द्विगुणीत होईल आणि शहरातील दिवाळीचा उत्साह अधिक उजळून निघेल.